कुटुंबव्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘स्वप्न तुझे माझे’ उपक्रम प्रभावीपणे राबवा- श्रीमती विजया रहाटकर

कुटुंबव्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘स्वप्न तुझे माझे’ उपक्रम प्रभावीपणे राबवा- श्रीमती विजया रहाटकर
कुटुंबव्यवस्था सक्षम करण्यासाठी ‘स्वप्न तुझे माझे’ उपक्रम प्रभावीपणे राबवा- श्रीमती विजया रहाटकर

महाराष्ट्र वाणी न्युज 

 छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.२१ :- राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राबविण्यात येत असलेला ‘स्वप्न तुझे माझे’ हा विवाहपूर्व संवादाचा उपक्रम आहे. यात संवादाद्वारे उपाययोजना होतात. कुटुंब व्यवस्था सक्षम करणारा हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा,असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती विजया रहाटकर यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. बैठकीपूर्वी श्रीमती रहाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘स्वप्न तुझे माझे’ च्या विवाहपूर्व संवाद केंद्र येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या वाचन कट्टा, हिरकणी कक्ष अशा उपक्रमांचीही पाहणी केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर झालेल्या बैठकीस श्रीमती रहाटकर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. शिवानी डे, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, माविम चे व्यवस्थापक चंदनसिंग राठोड तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महिला सक्षमीकरण उपक्रमांचे सादरीकरण

जिल्हाधिकारी स्वामी यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरण उपक्रमांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने बेटी बचाओ बेटी पढाओ, बाल विवाह प्रतिबंध, महिलांसाठी आर्थिक साक्षरता, पिंक ई रिक्षा, तक्रार समित्या, प्रशिक्षण, मुलींचा जन्मदर वाढविणे, शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बाल भिक्षेकरी, बाल कामगार यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अशा विविध उपक्रमांची व त्याच्या फलश्रुतीची माहिती देण्यात आली.

विवाहपूर्व संवाद आवश्यक

श्रीमती रहाटकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची, योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘स्वप्न तुझे माझे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कुटुंब व्यवस्था सक्षम आणि बळकट करण्यासाठी हा उपक्रम आहे. या उपक्रमात विवाहपूर्व संवाद याद्वारे घडवीला जातो. लग्न ठरण्याआधी दोन्हीकडच्या कुटुंबांना आपापसात भेटून संवाद साधता येतो. यात नवरा मुलगा, मुलगी, सासू, सून, नणंद असे विविध नातेवाईक आपापसात भेटून आपल्या नात्यांबद्दल संकल्पना स्पष्ट करू शकता. त्याद्वारे संभाव्य वाद, ताणतणाव यांचे निराकरण वेळीच होऊ शकते व दोन जणांचा संसार सुखाचा होऊ शकतो, अशी यात संकल्पना आहे. हा उपक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे न्यावा,असे आवाहन त्यांनी केले. 

महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण

त्यांनी अधिक माहिती दिली की, महिला आयोग महिलांविषयक तक्रारींची तातडीने दखल घेतो. १७ विविध स्वतंत्र कक्षांद्वारे हे कामकाज चालविले जाते. ती बदल घडवते या उपक्रमांतर्गत देशातील सर्व महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतरही आयोग सतत संपर्कात राहतो. महिलांविषयक कायदे तयार करण्यात महिला आयोगाच्या संशोधन उपक्रमांचे मोठे योगदान असते

विविध क्षेत्रातील महिलांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रशिक्षण

त्यांनी सांगितले की, आता राष्ट्रीय महिला आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या सुनावण्या या विभागस्तरीय मुख्यालयांच्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठांमध्ये ‘कॅम्पस कॉलिंग’ हा उपक्रम राबवून १००० पेक्षा अधिक कार्यक्रम घेण्यात येतील. महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘यशोदा’ असे या उपक्रमाचे नाव असेल. त्यात अंगणवाडी सेविका ते विविधस्तरातील महिलांना प्रशिक्षित करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमांचे कौतूक

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाबाबत राबविलेल्या विविध उपक्रमांचे श्रीमती रहाटकर यांनी स्वागत करुन अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची आयोगाने दखल घेतली असून हे उपक्रम राज्य आणि देशस्तरावर राबविण्याबाबत बाब विचाराधीन आहे.