अब्दुल सत्तार पुन्हा काँग्रेस भवनात; वाढदिवसाचे निमित्त की बदलत्या राजकारणाची चाहूल?

अब्दुल सत्तार पुन्हा काँग्रेस भवनात; वाढदिवसाचे निमित्त की बदलत्या राजकारणाची चाहूल?
अब्दुल सत्तार पुन्हा काँग्रेस भवनात; वाढदिवसाचे निमित्त की बदलत्या राजकारणाची चाहूल?

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तब्बल सात वर्षांनंतर काँग्रेसच्या गांधी भवनात हजेरी लावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसशी प्रदीर्घ राजकीय संबंध असलेल्या आणि नंतर पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सत्तार यांच्या या अचानक भेटीकडे अनेक राजकीय अर्थांनी पाहिले जात आहे.

मात्र, गांधी भवनात जाण्यामागे कोणतेही राजकीय कारण नसून काँग्रेसमधील जुने मित्र तथा प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो होतो, असे स्पष्टीकरण स्वतः आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

अब्दुल सत्तार यांच्या काँग्रेसमधील राजकीय प्रवासाची चर्चा आजही होते. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांचा काँग्रेस कार्यालयाशी जवळचा संबंध होता. काँग्रेसमधून बाहेर पडताना कार्यालयातील खुर्ची घेऊन गेल्याचा किस्साही शहरातील राजकीय वर्तुळात आजही चर्चेचा विषय ठरतो.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्तार यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्या काळात त्यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांना मदत केल्याचे आरोपही झाले होते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि इम्तियाज जलील लोकसभेत पोहोचले.

काळ बदलला आणि राजकीय समीकरणेदेखील बदलली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तार आणि काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यातील जवळीक चर्चेचा विषय ठरली. रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील निवडणुकीत सत्तार यांनी कल्याण काळे यांना मदत केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. या निवडणुकीनंतर काळे आणि सत्तार यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाल्याचेही दिसून आले.

याच पार्श्वभूमीवर जगन्नाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्तार गांधी भवनात पोहोचल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जुना मित्र आणि त्याच्या कुटुंबाशी असलेल्या संबंधांमुळे ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले असले, तरी राजकारणात नेत्यांच्या भेटीगाठींकडे केवळ वैयक्तिक संबंध म्हणून पाहिले जात नाही.

गांधी भवन हे शहरातील काँग्रेसच्या राजकीय घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अशा ठिकाणी सात वर्षांनंतर सत्तार यांनी केलेली उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करून पुढे शिवसेनेत प्रवेश केलेल्या अब्दुल सत्तार यांचे काँग्रेसशी असलेले जुने संबंध आणि सध्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण समीकरण यामुळे गांधी भवनातील ही भेट चर्चेचा विषय बनली आहे.

ही भेट केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांपुरती मर्यादित होती की आगामी काळातील बदलत्या राजकीय समीकरणांची एखादी नवी चाहूल होती, याबाबत आता राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.