जवाहरनगर पोलिसांची मोठी कारवाई; तीन आरोपी जेरबंद, 122 एलईडी टीव्हीसह वाहन व सुट्टे भाग हस्तगत! दोन वर्षे सुरू होती नोकरांची चोरी; 44 लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डि ८ :- मालकाच्या गोडाऊनमध्ये काम करत असतानाच विश्वासघात करून तब्बल दोन वर्षांपासून एक-एक आणि दोन-दोन एलईडी टीव्ही बाहेर काढून चोरी करणाऱ्या नोकरांच्या टोळीचा जवाहरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 122 एलईडी टीव्ही, टीव्हीचे सुट्टे भाग आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 44 लाख 44 हजार 977 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनी परिसरातील व्यापारी रविंद्रसिंह जसवंतसिंह जोहर यांच्या गोडाऊनमधून तसेच मोंढा नाका परिसरातील निशा प्राईड इमारतीतील ठिकाणाहून विविध आकाराचे एलईडी टीव्ही आणि टीव्हीचे सुट्टे भाग चोरीला गेल्याची बाब समोर आली होती.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, सन 2024 पासून 25 ऑगस्ट 2026 पर्यंत सुमारे 150 एलईडी टीव्ही आणि काही सुट्टे भाग चोरीला गेले, ज्यांची अंदाजे किंमत 34 लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मनिष दिलीप नरवडे (26), अकबर शेख मोहम्मद अली शेख (55) आणि राजेंद्रकुमार फुलचंद परदेशी (53) या तिघांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. तिघांना 26 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींनी गोडाऊनमध्ये काम करत असताना एलईडी टीव्ही हळूहळू बाहेर काढून चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. चोरीचा माल त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागासह जालना आणि नाशिक येथे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून कमी किमतीत विकल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून आरोपी आणि चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यक्तींकडून 122 एलईडी टीव्ही, टीव्हीचे सुट्टे भाग तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 44 लाख 44 हजार 977 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2 रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सय्यद मजहर यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाने केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, रविकुमार गादेकर यांच्यासह चंद्रकांत पोटे, रावते, विजेश चव्हाण, राजेंद्र शिंदे, मारुती गोरे, कपिल खिल्लारे आणि सुरे यांनी विशेष भूमिका बजावली.