टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली
टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी परिसरात गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यानची सुमारे ३० किलोमीटरची वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावरून सुरू ठेवण्यात आली आहे.

शनिवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ५ वाजता टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

मुंबईकडील वाहतूक हडस पिंपळगावातून वळवली

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावरून उतरवून धुळे-सोलापूर महामार्गावरून माळीवाडा येथे नेण्यात येत आहे. तेथून वाहने पुन्हा समृद्धी महामार्गावर प्रवेश करतील.

तर नागपूरकडून येणारी वाहने माळीवाडा इंटरचेंजवरून धुळे-सोलापूर महामार्गावर वळवून हडस पिंपळगाव येथे पुन्हा समृद्धी महामार्गावर आणली जात आहेत.

दोन्ही बाजूंचे व्हॉल्व्ह बंद

गेल कंपनीच्या तज्ज्ञांनी गॅस वाहिनीच्या दोन्ही बाजूंचे व्हॉल्व्ह बंद केले असून पाइपलाइनमधील दाब हळूहळू कमी होत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

वाहतुकीसंदर्भातील अधिक माहितीसाठी समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाच्या 1800 233 22 33 किंवा 8181818155 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.