आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा, मात्र शिवराळ भाषेला विरोध; सकल मराठा समाजाची भूमिका

आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा, मात्र शिवराळ भाषेला विरोध; सकल मराठा समाजाची भूमिका

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. ८ :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वापरल्या जाणाऱ्या एकेरी आणि आक्षेपार्ह भाषेला मात्र विरोध असल्याची भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांनी यापुढे राज्यातील प्रमुख नेत्यांबाबत बोलताना संयम आणि आदर राखावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकेरी उल्लेख किंवा शिवराळ भाषा वापरू नये, असे आवाहन समाजाच्या समन्वयकांनी केले.

मराठा समाजाच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. त्यामुळे एखाद्या राजकीय मतभेदाच्या मुद्द्यावरून व्यक्तीविषयी अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नसल्याचे सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला किंवा त्यांच्या उपोषणाला आमचा विरोध नाही. मात्र नेत्यांविषयीची शिवराळ भाषा आणि एकेरी उल्लेख याला आमचा ठाम विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.

जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषण करत आहेत, त्या परिसराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि वारशाचा संदर्भ आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना संयमित आणि सन्मानजनक भाषा वापरण्याचे भान ठेवावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतेही बिनबुडाचे आरोप करू नयेत तसेच त्यांच्याबाबत एकेरी अथवा अपमानास्पद शब्दांचा वापर टाळावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी सागर देवकर पाटील, सुहास बागल पाटील, पांडुरंग पाटील, विजय वाघ, मयूर पाटील, स्वराज पाटील, संतोष गावंडे आणि सुनील जाधव उपस्थित होते.