वीज कनेक्शनसाठी ५ हजारांची लाच! महावितरणचा कनिष्ठ अभियंता आणि वायरमन ACBच्या जाळ्यात

वीज कनेक्शनसाठी ५ हजारांची लाच! महावितरणचा कनिष्ठ अभियंता आणि वायरमन ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र वाणी

वैजापूर डि ८ :- नवीन वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकाने जाळ्यात पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३८ वर्षीय शेतकरी असून त्यांनी घरासाठी नवीन वीज जोडणी घेण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाइन अर्ज केला होता.

यानंतर तक्रारदार ५ सप्टेंबर रोजी खंडाळा येथील महावितरण उपकेंद्रात कनिष्ठ अभियंता नवनाथ दादा बेळे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी बेळे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता कनिष्ठ अभियंता नवनाथ बेळे यांनी पंचासमक्ष ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे. तसेच ही रक्कम वायरमन महेश शंकर पाडळे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचेही तपासात समोर आले.

त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मौजे बिलोनी, ता. वैजापूर येथील शेत गट क्रमांक २१ मधील तक्रारदाराच्या घरी नवीन वीज जोडणीसाठी वायरमन महेश पाडळे आले असता त्यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

या प्रकरणात खंडाळा उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता नवनाथ दादा बेळे (वय ५०) आणि वायरमन महेश शंकर पाडळे (वय २६) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शरदचंद्र सुरेशराव रोडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई पार पडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार करावी.