“१० दिवसांतच विजयांचा मोठा दणका; हसणाऱ्या IPS अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित!”
महाराष्ट्र वाणी
दि २७ :- तामिळनाडूमध्ये फक्त दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अभिनेता-राजकारणी Vijay यांनी घेतलेल्या एका कठोर निर्णयाची देशभरात चर्चा रंगली आहे. जनतेच्या भावना ओळखून तात्काळ कारवाई करणारा नेता म्हणून विजय यांच्याकडे पाहिले जात असून, सोशल मीडियावरही त्यांच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
पाच दिवसांपूर्वी कोयंबतूरमध्ये एका अवघ्या १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. पीडित कुटुंबासाठी न्यायाची मागणी होत असतानाच, या प्रकरणाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले तीन वरिष्ठ IPS अधिकारी हसताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संताप आणखी वाढला. एका अत्यंत संवेदनशील प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांची ही वर्तणूक अमानवी असल्याची टीका होत होती. मात्र मुख्यमंत्री विजय यांनी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने निर्णय घेत संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले.
विशेष म्हणजे, निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एका महिला IG अधिकाऱ्यासह दोन DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता विजय यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाची सार्वजनिक माफी मागत सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला.
या निर्णयानंतर सोशल मीडियावर “हीच खरी संवेदनशील नेतृत्वशैली” अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी तर “नायक” चित्रपटातील अनिल कपूर यांच्या भूमिकेची आठवण करून देत, विजय प्रत्यक्षात त्याहीपेक्षा वेगाने निर्णय घेत असल्याची चर्चा सुरू केली आहे.
वर्दी ही सत्तेचा माज दाखवण्यासाठी नसते, तर जनतेच्या वेदना समजून घेण्यासाठी असते — आणि त्या वेदनांवर मीठ चोळणाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, हा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
जनतेच्या भावनांचा आदर करणारे निर्णयच नेत्याला खऱ्या अर्थाने मोठं बनवतात… आणि सध्या विजय यांची चर्चा याच कारणासाठी देशभर रंगताना दिसत आहे.