इम्तियाज जलील यांच्या संघर्षातून उभं राहिलं ४०० खाटांचं महिला-बाल रुग्णालय”

इम्तियाज जलील यांच्या संघर्षातून उभं राहिलं ४०० खाटांचं महिला-बाल रुग्णालय”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- “मी आता आमदार नाही, खासदारही नाही... पण आज माझं मन भरून आलं आहे,” अशा भावनिक शब्दांत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा प्रवास उलगडला आहे. जालना रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या ४०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनाने ३६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा शासन निर्णय जारी केला आहे.

हे रुग्णालय ज्या जागेवर उभं राहत आहे, ती जागा पूर्वी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी राखीव करण्यात आली होती. मात्र, “कोट्यवधी रुपये खर्च करून स्मारक उभारण्याऐवजी जनतेसाठी रुग्णालय उभारले जावे,” अशी भूमिका घेत इम्तियाज जलील यांनी त्याला विरोध केला होता.

या निर्णयाविरोधात त्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात टीका, विरोध आणि धमक्यांनाही सामोरे जावे लागले. काहींनी त्यांच्या धर्मावरूनही टीका केली. मात्र, त्यांनी शांतपणे आपली लढाई सुरू ठेवली.

२०१४ ते २०१९ या आमदारकीच्या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत वारंवार हा मुद्दा उपस्थित केला. पण त्यावर चर्चा होण्यासही तयार नसल्याचा दावा त्यांनी केला. अखेर त्यांनी २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने शहराची गरज ओळखून स्मारकासाठी राखीव जमीन रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्याचा आदेश दिला.

या लढ्यात त्यांचे वकील शैलेश ब्रह्मे यांनी एक रुपयाही शुल्क न घेता मदत केली. त्यानंतर निधी मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि कामाचा पाठपुरावा करत रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. सध्या या रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या सहा महिन्यांत ते सुरू होण्याची शक्यता आहे.

“या रुग्णालयाचा लाभ आमदार, खासदार किंवा मोठ्या नेत्यांना नाही, तर गरीब आणि गरजू जनतेला होणार आहे,” असेही जलील यांनी स्पष्ट केले.

“उद्घाटनाला मला निमंत्रण मिळेल की नाही माहिती नाही. फीत कदाचित माझ्या विरोधकांच्या हस्ते कापली जाईल. पण जालना रोडवरून जाताना त्या इमारतीकडे पाहून मी स्वतःलाच सांगेन – ‘इम्तियाज, तू करून दाखवलंस!’” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जनतेसाठी केलेला संघर्ष कधीच वाया जात नाही; इतिहास शेवटी त्याची नोंद घेतो...