"शिवाजीनगरमध्ये कोयता घेऊन दहशत; पोलिसांनी ठोकल्या बेड्या!"

"शिवाजीनगरमध्ये कोयता घेऊन दहशत; पोलिसांनी ठोकल्या बेड्या!"
"शिवाजीनगरमध्ये कोयता घेऊन दहशत; पोलिसांनी ठोकल्या बेड्या!"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५:- शिवाजीनगर परिसरात हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका सराईत आरोपीला जवाहरनगर पोलिसांच्या बिट मार्शल पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून धारदार कोयता आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जवाहरनगर बिट मार्शलचे पोलीस कर्मचारी मारोती गोरे यांना गुप्त माहिती मिळाली की, शिवाजीनगर परिसरात एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले.

त्यानंतर पोउपनि मोरे, मपोह उपाध्ये, पोलीस कर्मचारी मारोती गोरे तसेच डायल-११२ पथकातील वामन नागरे यांनी शिवाजीनगर परिसरातील रेल्वे भुयारी मार्गाजवळ सापळा रचला. पोलिसांना पाहताच संशयिताने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून त्याला काही अंतरावरच ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव दिपक उर्फ यश सचिन साळवे (वय १९, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला धारदार कोयता आणि खिशात विवो कंपनीचा मोबाईल आढळून आला. मोबाईलबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त केल्या.

पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. यापूर्वी त्याच्यावर मोबाईल हिसकावण्याचा गुन्हा दाखल असून बालवयातही त्याच्याविरोधात दोन गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र पाडळकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम असल्याचा संदेश या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाला आहे.