गोवंश तस्करांवर ग्रामीण पोलिसांचा मोठा प्रहार; २४ जनावरांची सुटका, ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २२ :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करी, अवैध कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोठी धडक कारवाई करत तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी निर्णायक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेमुळे तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दिनांक २६ मे ते २१ जून २०२६ या कालावधीत ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील चोरट्या मार्गांवर कडक नाकाबंदी आणि नियोजित गस्त वाढवून मोठी कारवाई केली. या विशेष मोहिमेत आतापर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल ७३ लाख ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवंश तस्करीसाठी वापरली जाणारी ८ वाहने जप्त करण्यात आली असून दोन वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केर्हाळा गावाजवळील परदेशीवाडी परिसरात काही व्यक्तींनी गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती सिल्लोड ग्रामीणचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. रवींद्र ठाकरे यांना मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांनी २० जून रोजी रात्री सापळा रचत धाड टाकली.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र घटनास्थळी २४ गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय अवस्थेत अन्न-पाण्याविना बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी तातडीने या जनावरांची सुटका केली. जप्त केलेल्या जनावरांची अंदाजे किंमत ९ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. जनावरांना पुढील संगोपनासाठी अधिकृत गोशाळेत हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी अहमद महबूब पठाण आणि अहमद खाँ मोहम्मद खाँ पठाण (रा. केर्हाळा, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, भारतीय प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० आणि बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र ठाकरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी!