"रामराईत पोलिसांचा मोठा रेड! 1.757 किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंद!"

"रामराईत पोलिसांचा मोठा रेड! 1.757 किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंद!"
"रामराईत पोलिसांचा मोठा रेड! 1.757 किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंद!"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- शहरातील अंमलीपदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत रामराई शिवार परिसरातून 1 किलो 757 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 87 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 जुलै 2026 रोजी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामराई शिवार, जोगेश्वरी–वाळूज रोडवरील तलावाजवळ सापळा रचण्यात आला.

कारवाईदरम्यान सुभाष शहाजी पवार (वय 31) हा गांजाची बेकायदेशीर विक्री करताना रंगेहात आढळून आला. त्याच्या ताब्यातून 1 किलो 757 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान हा गांजा नितीन भगवान काळे, रा. रामराई शिवार, याचा असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

दरम्यान, शहरात कुठेही अंमलीपदार्थांची विक्री, सेवन किंवा अशा प्रकारच्या अवैध हालचाली आढळल्यास नागरिकांनी 9684702002 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.