लग्नकार्यासाठी आता एसटी बस बुक करा! ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात बस उपलब्ध
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- ग्रामीण भागातील लग्नांसाठी एसटीची विशेष सेवा; शेतकरी कुटुंबांना सवलतीच्या दरात बस उपलब्ध
मुंबई : ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ किंवा इतर शुभकार्यांसाठी पाहुण्यांची आणि वऱ्हाड्यांची वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खासगी वाहनांचे वाढते भाडे आणि पर्यायांचा अभाव यामुळे अनेकदा ट्रॅक्टर, टेम्पो किंवा मालवाहू वाहनांचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ग्रामीण नागरिकांसाठी विशेष सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बसेसच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा इतर कौटुंबिक शुभकार्यासाठी एसटी बस आरक्षित करता येणार असून, त्यासाठी सवलतीचे दर लागू करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे मालवाहू किंवा अवैध वाहनांमधून प्रवास करण्याची गरज कमी होईल. परिणामी, वऱ्हाडी आणि पाहुण्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह होण्यास मदत मिळेल. तसेच अशा धोकादायक प्रवासामुळे घडणाऱ्या अपघातांवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.
एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळण्याबरोबरच सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लग्नसमारंभ आणि इतर कौटुंबिक कार्यक्रमांचे नियोजन अधिक सुलभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.