कन्नडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मतदार यादी पुनरिक्षणाचा आढावा; १००% काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा सत्कार

कन्नडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मतदार यादी पुनरिक्षणाचा आढावा; १००% काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा सत्कार
कन्नडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा मतदार यादी पुनरिक्षणाचा आढावा; १००% काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा सत्कार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १० :- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी गुरुवारी कन्नड तालुक्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शंभर टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्र क्रमांक १८४, २७९ आणि ३२५ येथील १०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यानंतर जिल्हाधिकारी गौडा यांनी अंधानेर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन एसआयआर मोहिमेच्या कामाची पाहणी केली. त्यांनी शाळा परिसरात वृक्षारोपण केले तसेच परिसरातील घनदाट वनालाही भेट दिली.

दौऱ्यादरम्यान मुंडवाडी येथील आदर्श शेतकरी तेजराव बारगळ यांच्या 'अंकुर' रोपवाटिकेला भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना संजय गांधी निराधार योजनेची मंजुरीपत्रे त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

औराळा परिसरातही जिल्हाधिकारी गौडा यांनी बीएलओंशी संवाद साधत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचे काम अधिक वेगाने आणि अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.