मुंबईत नाव बदलून लपला होता ‘रायडर’! दोन दिवस वेशांतर करून गुन्हे शाखेची थरारक कारवाई; खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. ४ :- खून करून मुंबईत नाव बदलून राहत असलेल्या आरोपीला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेने थरारक कारवाई करत अटक केली आहे. तब्बल अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आसीफ उर्फ रायडर सय्यद हनीब (वय ३३, रा. चेलीपुरा, कांचीवाडा, छत्रपती संभाजीनगर, सध्या नागपाडा, मुंबई) याला वेशांतर करून दोन दिवस गुप्तपणे शोध मोहिम राबवत ताब्यात घेण्यात आले.
सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७९/२०२५ अंतर्गत आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील फिर्यादी सना कौसर समीर खान (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी शहाबाजार येथील सिटीजन हॉस्पिटलसमोरील गल्लीत त्यांचे पती मोटारसायकलवरून जात असताना आसीफ उर्फ रायडर याने सुपारी देऊन साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नाव बदलून मुंबईतील नागपाडा परिसरात राहत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईत शोधमोहीम सुरू केली.
नागपाडा परिसर हा गजबजलेला आणि व्यापारी वस्तीचा भाग असल्याने आरोपी सहज मिळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी रणनीती बदलत पथकातील कर्मचाऱ्यांना वेशांतर करून परिसरात माहिती संकलन करण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवस परिसरात गुप्तपणे वावरत असताना आरोपी एका मोटारसायकलवरून जाताना दिसून आला.
पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. आरोपीला सिटी चौक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज शिंदे करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशीकांत सातव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या शहरातील प्रत्येक मोठ्या घडामोडींचे अचूक आणि वेगवान अपडेट!