उघड्यावर मांसविक्रीवर FDAचा दणका; गंगापूर-लासूर स्टेशनमधील १२ दुकानांवर कारवाई, ६ दुकाने सील
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. ३ :- उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत गंगापूर आणि लासूर स्टेशन परिसरातील एकूण १२ दुकानांची तपासणी केली. यापैकी विनापरवाना सुरू असलेल्या ६ दुकानांना थेट सील ठोकण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गंगापूर येथील ५ आणि लासूर स्टेशन येथील १ अशा एकूण ६ दुकानांवर कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील मांसविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सहआयुक्त श्रीकांत करकळे आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्ञा सुरसे, प्रशांत अजिंठेकर व कर्मचारी, स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी गंगापूर येथील ८ व लासूर स्टेशन येथील ४ अशा एकूण १२ मांस विक्री दुकानांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान अनेक दुकाने विनापरवाना सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर गंगापूरमधील ५ आणि लासूर स्टेशनमधील १ दुकानाला तातडीने सील करण्यात आले. तसेच स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाल्याशिवाय अन्न विभागाकडून परवाना मिळणार नसल्याच्या स्पष्ट सूचना संबंधित दुकानदारांना देण्यात आल्या.
वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ – आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आणि विश्वासार्ह आढावा!