वय फक्त १२ वर्षे, पण कल्पना अफाट! सोलापूरच्या अब्दुल्लाने बनवली सौरऊर्जेवर धावणारी भन्नाट सायकल
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- सोलापूरच्या अरुंद गल्ल्यांतून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. अवघ्या १२ वर्षांच्या अब्दुल्ला इम्रान या चिमुकल्याने आपल्या कल्पकतेच्या जोरावर अशी कामगिरी केली आहे, ज्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ज्या वयात बहुतांश मुले खेळ आणि मोबाईलमध्ये रमलेली असतात, त्या वयात अब्दुल्लाने विज्ञान आणि नवकल्पनांची वेगळी वाट निवडली.
अब्दुल्लाने केवळ सुमारे ९ हजार रुपयांच्या खर्चात सौरऊर्जेवर आणि बॅटरीवर चालणारी आधुनिक सायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे या सायकलमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, डिजिटल स्पीडोमीटर आणि व्हॉइस कंट्रोलसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. बॅटरी संपल्यास ही सायकल सामान्य सायकलप्रमाणे सहज चालवता येते.
ही सायकल तयार करण्यासाठी अब्दुल्लाने जवळपास सहा महिने मेहनत घेतली. भंगार साहित्याचा योग्य वापर करत त्याने आपल्या कल्पनांना वास्तवात उतरवले. मर्यादित साधनांमध्येही मोठे स्वप्न पूर्ण करता येते, हे त्याने कृतीतून दाखवून दिले आहे.
अब्दुल्लाची ही कामगिरी केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, जिद्द आणि नवनिर्मितीची आवड असेल, तर वय कधीच आड येत नाही हे या चिमुकल्याने सिद्ध करून दाखवले आहे.
👉 अशीच प्रेरणादायी बातम्या वाचण्यासाठी जोडलेले रहा महाराष्ट्र वाणी सोबत.