अतिवृष्टीचा परिणाम! अकरावी प्रवेश प्रक्रियेला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्र वाणी
मुंबई, दि. ६ :- राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्या जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरी-१ ला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेळ मिळणार आहे.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
विशेष फेरी-१ अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांनी संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी ‘Proceed for Admission’ पर्यायाचा वापर करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार असून १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन निर्धारित मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.
वेळ हातातून जाऊ देऊ नका! अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत आता ८ जुलै – विद्यार्थ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी.