सिल्लोड काँग्रेसमध्ये मोठा बदल; शहराध्यक्षपदी आवेस आझाद तर तालुकाध्यक्षपदी अॅड. निलेश काळे यांची नियुक्ती

सिल्लोड काँग्रेसमध्ये मोठा बदल; शहराध्यक्षपदी आवेस आझाद तर तालुकाध्यक्षपदी अॅड. निलेश काळे यांची नियुक्ती
सिल्लोड काँग्रेसमध्ये मोठा बदल; शहराध्यक्षपदी आवेस आझाद तर तालुकाध्यक्षपदी अॅड. निलेश काळे यांची नियुक्ती

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड | प्रतिनिधी दि २८ :- काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानांतर्गत सिल्लोड तालुक्यात पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिफारसीनुसार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनंतर सिल्लोड शहराध्यक्षपदी शेख आवेस आझाद (कैसर आझाद) तर तालुकाध्यक्षपदी प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. निलेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जिल्ह्यात निरीक्षक पाठवून स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार विविध भागांतील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यभरात ब्लॉक आणि शहराध्यक्षांच्या नियुक्तीची यादी जाहीर करण्यात आली. या प्रक्रियेत नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला.

यापूर्वी सिल्लोड तालुकाध्यक्ष म्हणून भास्करराव पाटील घायवट तर शहराध्यक्ष म्हणून शेख फेरोज अकबर कार्यरत होते. मात्र गेल्या काही वर्षांत पक्ष संघटना मजबूत करण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. तसेच सिल्लोड नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आलेल्या अडचणींचाही मुद्दा पक्षश्रेष्ठींकडे मांडण्यात आला होता.

यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद शेख, जिल्हा सरचिटणीस शांतीलाल अग्रवाल, वसीम देशमुख यांच्यासह इतर नेत्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी या मागणीची दखल घेत नव्या नियुक्त्या जाहीर केल्या.

या नियुक्तीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कल्याणराव काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, विलास औताडे, राष्ट्रीय सचिव नासेर पठाण, माजी आमदार एम.एम. शेख, कमाल फारुकी, इब्राहिम खान पठाण, आमेर अब्दुल सलीम, अॅड. सय्यद अक्रम, विश्वास औताडे, शेख इकबाल अहमद यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

सिल्लोड काँग्रेसमधील या नव्या बदलांमुळे आगामी स्थानिक राजकारणात पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.