SIR मोहिमेसाठी शिवसेनेने कंबर कसली; सिल्लोडमध्ये बीएलए, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

खा. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची उपस्थिती; प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद करण्याचे आवाहन

SIR मोहिमेसाठी शिवसेनेने कंबर कसली; सिल्लोडमध्ये बीएलए, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
SIR मोहिमेसाठी शिवसेनेने कंबर कसली; सिल्लोडमध्ये बीएलए, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड दि १२ :- विशेष मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे बूथ लेव्हल एजंट (BLA), पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिर व आढावा बैठक सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयातील शिवसेना भवन येथे उत्साहात पार पडली.

या शिबिराला खासदार संदीपान भुमरे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर, आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे मार्गदर्शक प्रशांत घोरपडे व दिग्विजय पाटील यांनी विशेष मतदार पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेची उद्दिष्टे, मतदार पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया, बीएलएंची जबाबदारी तसेच प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीत विशेष मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद व्हावी, अपात्र व बोगस मतदारांची नावे ओळखून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी तसेच कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये, यासाठी बीएलएंनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. खासदार संदीपान भुमरे यांनी SIR कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे सांगितले.

या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, बूथ लेव्हल एजंट (BLA) आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.