"उद्या दुपारी १२ पूर्वी पंपिंग सुरूच झाली पाहिजे!पाणीपुरवठ्यावर आयुक्तांचा 'अल्टिमेटम
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ :- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. "कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान पाणीपुरवठ्याची पंपिंग सुरू झालीच पाहिजे. आता कोणतीही दिरंगाई किंवा सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत," अशा कठोर शब्दांत त्यांनी स्पष्ट इशारा दिला.
बुधवारी (९ जुलै) स्मार्ट सिटी कार्यालयात आयुक्त येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत सध्या बंद असलेली पंपिंग व्यवस्था, जॅकवेल देखभाल आणि व्हॉल्व बदलण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
रात्रीच नियोजन, सकाळी काम पूर्ण करण्याचे आदेश
आयुक्तांनी संबंधित एजन्सी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि महापालिकेच्या अभियंत्यांना आजच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. रात्रीच नवीन व्हॉल्व बसविण्याचे नियोजन करावे, प्रकाशाअभावी काम शक्य नसल्यास सूर्योदय होताच काम सुरू करून उद्या दुपारी १२ वाजण्यापूर्वी पंपिंग सुरू करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
एजन्सीला फटकारले
बैठकीदरम्यान एजन्सीच्या प्रतिनिधींनी कामातील विलंबाबाबत कारणे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "तुमची डेडलाईन आधीच संपली आहे. आता कारणे नकोत, आधी काम पूर्ण करा," असे सुनावत एजन्सीला फटकारले. तसेच एप्रोच चॅनेलचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश
नवीन व्हॉल्वच्या ऑर्डरचे नियमित ट्रॅकिंग करून वेळेत उपलब्ध होतील याची खात्री करावी.
ज्या ठिकाणी व्हॉल्व खराब आहेत, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित एजन्सीची राहील.
नवीन व्हॉल्व आल्यानंतर पाच दिवसांच्या आत ते बदलण्याचे काम पूर्ण करावे.
आवश्यकतेनुसार नियोजित शटडाऊन घेऊन काम पूर्ण करावे.
बैठकीला अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला विशेष कार्यकारी अधिकारी ए.बी. देशमुख, के.एम. फालक, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता सचिन वाईकर, सर्व कनिष्ठ अभियंते, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार रामधन जाधव, योगेश काळे, तसेच जीव्हीपीआरचे सिद्धांत ठाकरे, आशुतोष पांडेय आणि एमजेपीचे राम नारायण यांच्यासह संबंधित अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.