स्वच्छता,सात्विकता आणि सुरक्षितता या त्रिसूत्री चे पालन केल्यास सेवेचे समाधान-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
✍️ महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.११ :- हॉटेल चालकांनी व्यवसायात स्वच्छता,सुरक्षितता आणि सात्त्विकता या त्रिसूत्री चे पालन करावे. तर त्यांना व्यवसायातून समाजाची सेवा केल्याचे समाधान लाभेल, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हॉटेल व्यावसायिकांना हितोपदेश दिला.
अन्न व औषध प्रशासन तर्फे आयोजित हॉटेल चालकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे संकल्पनेनुसार व अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डूबे-पाटील यांचे निर्देशानुसार जिल्ह्यात 24 डिसेंबर ते 10 जानेवारी या कालावधीत प्रशासनातर्फे नववर्ष संकल्प -सुरक्षित अन्न ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त आस्थापना चालकांचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, हॉटेल चालकांनी व्यवसायात स्वच्छता,सुरक्षितता आणि सात्त्विकता या त्रिसूत्री चे पालन करावे. तरच त्यांना व्यवसायातून समाजाची सेवा केल्याचे समाधान लाभेल.
या मोहीमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 70 रेस्टॉरंट, हॉटेल व क्लब याच्या तपासणी करण्यात आल्या तसेच अन्न व्यावसायिकांना हस्तपत्रके व कार्यशाळा या माध्यमातून कायद्यातील तरतूदींची व सुरक्षित अन्न हाताळणी बाबत माहिती देण्यात आली. या मोहीमेअंतर्गत तपासणी केलेल्या अन्न आस्थापनांमधून सर्वोत्कृष्ट प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त आस्थापनांची निवड जिल्हास्तरीय समीतीतर्फे करण्यात आली. 80%पेक्षा जास्त गुणप्राप्त सर्व अन्न व्यावसायिकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी केले. उपस्थितांना निवृत्त सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तीका झाडे यांनी केले.आभार प्रदर्शन योगेश चिभडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सह आयुक्त श्री सचिन केदारे व सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर,प्रज्ञा सुरसे,वर्षा रोडे,ज्योत्स्ना जाधव,प्रशांत अजिंठेकर व फरीद सिद्दीकी यांनी केले.
कार्यक्रमाला हॉटेल असोसिएशन चे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच जिल्ह्यातील हॉटेल रेस्टॉरंट चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.