उपचारासाठी धावपळ संपणार! आता ८ तासांत मंजुरी; रुग्णालयातूनच अर्ज प्रक्रिया सुरू

उपचारासाठी धावपळ संपणार! आता ८ तासांत मंजुरी; रुग्णालयातूनच अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र वाणी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू होणार असून, या नव्या व्यवस्थेमुळे उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक सहाय्याची मंजुरी अवघ्या ८ तासांत मिळणार आहे.

या प्रणालीतील सर्वात मोठा बदल म्हणजे आता रुग्णाला स्वतः अर्ज भरावा लागणार नाही. संबंधित रुग्णालयच थेट मदत कक्षाशी जोडले जाऊन अर्ज सादर करणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची धावपळ कमी होऊन उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे.

ही आधुनिक ऑनलाईन प्रणाली येत्या काही दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, “रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे. यामुळे अर्ज मंजुरी जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.” अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) राज्यातील तब्बल ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपये इतकी वैद्यकीय मदत वितरित करण्यात आली आहे.

👉 उपचारासाठी पैशांची अडचण आता अडथळा ठरणार नाही—सरकारची ही नवी प्रणाली गरजूंना खऱ्या अर्थाने दिलासा देणारी ठरणार आहे!