राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी समित्यांचे पुनरुज्जीवन; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी समित्यांचे पुनरुज्जीवन; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

महाराष्ट्र वाणी 

मुंबई, दि. २६ :- राज्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवण्यासाठी विविध आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी स्थानिक पातळीवरील समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) आणि ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्यांमार्फत आरोग्य सेवांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होऊ शकते. त्यामुळे या समित्यांना सक्रिय करून त्यांच्या कामकाजाला गती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांद्वारे आरोग्य सेवा पुरवल्या जातात. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समित्यांनी नियमित बैठकांचे आयोजन करून स्थानिक समस्यांवर ठोस कृती आराखडे तयार करावेत, असे निर्देश देण्यात आले.

यासोबतच समिती सदस्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी उपक्रम, तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधणे यावरही भर देण्यात आला. लोकप्रतिनिधी—खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्य—यांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही समित्यांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे सांगताना राज्यातील सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आरोग्य व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री आबिटकर यांनी केले.

“आरोग्य व्यवस्था मजबूत झाली तरच राज्याचा विकास खऱ्या अर्थाने वेगाने होईल!”