समृद्धी महामार्गावर ‘सिनेमास्टाईल’ दरोडा; धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले

समृद्धी महामार्गावर ‘सिनेमास्टाईल’ दरोडा; धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले
समृद्धी महामार्गावर ‘सिनेमास्टाईल’ दरोडा; धावत्या कारचे टायर फोडून कुटुंबाला लुटले

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २९ :- वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आता गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आला आहे. सिन्नर तालुक्यातील मलढोण-दुशिंगपूर परिसरात मध्यरात्री दरोडेखोरांनी धावत्या वाहनांना लक्ष्य करत लुटमारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडी धारदार वस्तू रस्त्यावर टाकून वाहनांचे टायर फोडण्यात आले. त्यानंतर वाहन थांबताच प्रवाशांना धमकावत लूट करण्यात आली.

गुरुवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ५३८ ते ५४३ दरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती आहे. तब्बल दीड तास दरोडेखोरांनी महामार्गावर धुमाकूळ घातल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, तीन वाहनांना या टोळीने लक्ष्य केले. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या मिश्रा कुटुंबाच्या कारमधून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटण्यात आली.

१००च्या वेगातील कार अचानक आदळली

श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले की, २७ ऑगस्ट रोजी ते कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे निघाले होते. सिन्नरजवळ त्यांची कार सुमारे १०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असताना अचानक जोरदार धक्का बसला. त्यांनी प्रसंगावधान राखत कार बाजूला थांबवली. तपासणी केली असता टायर फुटण्यासोबतच रिमचेही नुकसान झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

स्टेपनी काढण्यासाठी ते कारच्या डिकीजवळ गेले असता अचानक त्यांच्या पाठीवर हल्ला करण्यात आला. चेहऱ्यावर मास्क लावलेले चार ते पाच जण त्यांच्यावर तुटून पडले. काही क्षणांतच आणखी काही जण तेथे आले आणि कुटुंबाला घेरण्यात आले.

चिमुकल्याला आईच्या मांडीवरून हिसकावले

दरोडेखोरांनी मिश्रा यांच्या पत्नीच्या मांडीवर असलेल्या मुलालाही हिसकावून घेतले. त्यामुळे कुटुंबीय अक्षरशः हादरले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी विरोध न करता दरोडेखोरांना हवे ते घेऊन जाण्याची विनंती केली.

यानंतर दरोडेखोरांनी पाकिटातील रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, बांगड्या आणि इतर दागिने काढून घेतले. काही दागिने काढता येत नसल्याने ते जबरदस्तीने ओढून काढल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

कारमधील बॅगांचीही झडती घेण्यात आली. कपडे, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूही दरोडेखोरांनी सोडल्या नाहीत. विशेष म्हणजे कारची स्टेपनी बसवून देण्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मुलं घाबरलेली असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले.

‘मुलाला घेऊन गेले असते तर...’

श्वेता मिश्रा यांनी या घटनेचा थरारक अनुभव सांगताना दरोडेखोरांनी मुलाला कारमधून बाहेर फेकून दिल्याचे सांगितले. त्यांच्या मते, कुटुंबीयांनी विरोध केला असता तर मुलाला घेऊन जाण्याची भीती होती.

या घटनेनंतर मिश्रा कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र एवढ्या गंभीर घटनेनंतरही कुटुंबीय अद्याप भीतीच्या वातावरणातून बाहेर आलेले नाहीत.

दागिने आणि रोख रक्कम लुटली

मिश्रा कुटुंबाच्या माहितीनुसार दरोडेखोरांनी ५ सोन्याच्या अंगठ्या, २ सोन्याचे ब्रेसलेट, २ सोन्याच्या चेन, १ मंगळसूत्र, २ सोन्याच्या बांगड्या, २ पाटल्या, २ घड्याळे आणि ८५ हजार रुपये रोख असा मोठा ऐवज लुटून नेला.

समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर फोडून प्रवाशांना लक्ष्य करण्याच्या या प्रकारामुळे महामार्गाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.