"ऑल आऊट ऑपरेशनचा धडाका! रोडरोमिओंवर ग्रामीण पोलिसांचा प्रहार; ३२ जणांवर कारवाई, ४.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त"

"ऑल आऊट ऑपरेशनचा धडाका! रोडरोमिओंवर ग्रामीण पोलिसांचा प्रहार; ३२ जणांवर कारवाई, ४.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त"
"ऑल आऊट ऑपरेशनचा धडाका! रोडरोमिओंवर ग्रामीण पोलिसांचा प्रहार; ३२ जणांवर कारवाई, ४.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद), दि. ४ :- महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या विशेष "ऑल आऊट ऑपरेशन" अंतर्गत रोडरोमिओ, टवाळखोर आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शाळा-महाविद्यालय परिसरात टवाळखोरी करणाऱ्या ३२ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, जिल्हाभरात एकूण ११३ गुन्हे दाखल करून १४७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑगस्ट ते ४ ऑगस्टदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, बसस्थानके तसेच महिला व मुलींची वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालय परिसरात विशेष गस्त घालत महिला व विद्यार्थिनींना त्रास देणारे, पाठलाग करणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्या रोडरोमिओंविरोधात कारवाई केली. या कारवाईत मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ११० आणि ११७ अन्वये ३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई

अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत ५५ गुन्हे दाखल केले. या प्रकरणांमध्ये ५७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या, गावठी हातभट्टीची दारू, रसायने, ड्रम आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. या कारवाईत एकूण ३ लाख ९२ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याशिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अंतर्गत आठ प्रतिबंधात्मक कारवायाही करण्यात आल्या.

शाळा परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कोटपा (COTPA) कायद्यांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत ५८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच १९ हजार ६४७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाईची ठळक आकडेवारी

एकूण गुन्हे : ११३

एकूण आरोपी : १४७

रोडरोमिओंवर कारवाई : ३२

दारूबंदी गुन्हे : ५५

कोटपा अंतर्गत गुन्हे : ५८

एकूण जप्त मुद्देमाल : ४ लाख १२ हजार ३२७ रुपये

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या तसेच अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.