दशमेश नगरातील कॅफेला भीषण आग; सुमारे ५ लाखांचे नुकसान
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डि २८ :- शहरातील दशमेश नगर परिसरातील एका कॅफेला शुक्रवारी (२८ ऑगस्ट) रात्री आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे ११.२७ वाजता अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
दशमेश नगर येथील राहुल वाघमारे यांच्या कॅफेला आग लागल्याची माहिती श्री. गुजराती यांनी फायर कंट्रोलला दिली. त्यानंतर अग्निशमन जवानांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न करत आग पूर्णपणे विझवली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, आगीत कॅफेचे अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक लिमकर, अग्निशामक जवान प्रसाद शिंदे, अजिंक्य भगत, मनसुबराव सपकाळ, विक्रांत बकले, प्रणाल सूर्यवंशी, सोमेश्वर बचाते तसेच वाहनचालक जगदीश सलामबाद आणि प्रशांत गायकवाड यांनी आग विझविण्याची कारवाई केली.