ट्रेनमध्ये विसरलेला २८ हजारांचा मोबाईल रेल्वे पोलिसांनी शोधून केला परत; मध्यरात्री पतीकडे सुपूर्द

नंदीग्राम एक्स्प्रेसमधील प्रकार; रेल्वे पोलीस आणि रेल्वे सेना टीमच्या तत्परतेचे प्रवासी महिलेने मानले आभार

ट्रेनमध्ये विसरलेला २८ हजारांचा मोबाईल रेल्वे पोलिसांनी शोधून केला परत; मध्यरात्री पतीकडे सुपूर्द

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- मुंबई-बल्लारशहा नंदीग्राम एक्स्प्रेसमधून प्रवास करताना विसरून गेलेला सुमारे २८ हजार रुपये किमतीचा मोबाईल रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशाला सुखरूप परत मिळाला. रेल्वे पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे प्रवासी महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कौतुक करत आभार मानले.

नमिता ठोले या ठाणे ते रोटेगाव असा प्रवास करत होत्या. ट्रेन क्रमांक ११००१ नंदीग्राम एक्स्प्रेसच्या एसी कोच बी-३ मधील सीट क्रमांक ६९ व ७० येथे त्यांचा सुमारे २८ हजार रुपये किमतीचा मोबाईल राहून गेला. रोटेगावकडे प्रवास केल्यानंतर मोबाईल विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी लासूर स्टेशन येथील नातेवाईक दिलीप पांडे यांना याबाबत माहिती दिली.

दिलीप पांडे यांनी तातडीने रेल्वे सेना टीमचे अध्यक्ष सोमाणी सर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती ऑनड्युटी जीआरपीच्या रात्रपाळीतील हेड कॉन्स्टेबल हरिभाऊ स्वप्ने (गुरुजी) यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म ड्युटीवरील हेड कॉन्स्टेबल दिगंबर राठोड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कसारे तसेच महिला पोलीस कर्मचारी नीता तास्कार आणि माया गायकवाड यांनी तातडीने नंदीग्राम एक्स्प्रेसच्या संबंधित कोचमध्ये जाऊन शोध घेतला. सीटखाली पडलेला मोबाईल पोलिसांना आढळून आला. तो सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.

दरम्यान, प्रवासी महिलेच्या विनंतीनुसार त्यांचे पती नीरज पाटणी यांना मोबाईल सुपूर्द करण्यात आला. मध्यरात्री सुमारे १ वाजता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.