लॉटरीचे आमिष दाखवून वृद्ध महिलांना लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २ :- लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तसेच स्वतःला पोलीस असल्याचे भासवून वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल २९ लाख २ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये २६.५ तोळे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल, जप्त करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आफताब उर्फ फईम अहमद शेख (वय ५२, रा. किराडपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे आहे. आरोपीने शहरातील विविध भागांत वृद्ध महिलांना लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून त्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली आहे.
नेमके काय घडले?
हर्सूल येथील शिवेश्वर कॉलनीतील रहिवासी कमलबाई सुखदेव शिंदे (वय ६८) या २६ जुलै रोजी घरी जात असताना आरोपी त्यांच्याजवळ आला. "तुम्हाला लॉटरी लागली आहे," असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना मोटारसायकलवर बसवून राजधानी हॉटेलजवळील हर्सूल टी-पॉइंट परिसरात नेले.
तेथे बँकेतील अधिकाऱ्यांना दाखवायचे असल्याचे सांगून आरोपीने कमलबाई यांच्या हातातील तीन तोळे सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि काही वेळात परत येतो असे सांगून पसार झाला. नंतर बँकेत जाऊन बांगड्या आणि लॉटरीचे पैसे घेण्यास सांगितले; मात्र तेथे कोणतीही बँक नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले.
गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. चौकशीत आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने शहरातील अनेक भागांत अशाच प्रकारे वृद्ध महिलांची फसवणूक केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली. तसेच आरोपीने विक्री केलेले सोन्याचे दागिने सोनाराकडून हस्तगत करण्यात आले.
आठ गुन्हे उघडकीस
या कारवाईत हर्सूल, मुकुंदवाडी, सिडको, पुंडलिकनगर, क्रांती चौक आणि नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्यांतील एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल नागपूर येथून चोरी केल्याचेही तपासात समोर आले आहे.
या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर आणि त्यांच्या पथकाने केला.