मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी, ग्रामीण पेयजल धोरण २०२६ जाहीर
महाराष्ट्र वाणी
मुंबई, दि. १६ :- मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली.
वैद्यकीय उपचारांमध्ये अधिक अचूक निदान शक्य व्हावे यासाठी नागपूर येथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प (NHECP) उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मध्य भारतातील हा एकमेव महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून विविध गंभीर आजारांचे निदान करण्यासाठी आधुनिक निदान प्रणाली उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६ जाहीर करण्यात आले. विविध योजनांचे एकत्रिकरण करून स्वच्छ, निर्जंतुक व दर्जेदार पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात आला आहे.
तसेच महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली (Unmanned Systems Policy) धोरण-२०२६ ला मंजुरी देण्यात आली. या धोरणामुळे ड्रोन, रोबोटिक्स आणि इतर स्वयंचलित उपकरणांच्या निर्मिती, संशोधन, विकास आणि प्रशिक्षणाला चालना मिळणार आहे. कृषी, सागरी, हवाई तसेच जोखमीच्या क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा सरकारचा उद्देश आहे.
राज्यात भारत नेट कार्यक्रमाच्या सुधारित अंमलबजावणीस मंजुरी देण्यात आली असून "महानेट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MDIL)" या विशेष हेतू वहन यंत्रणेची (SPV) स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
विकसित भारत-जी राम जी (VBGRJ) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास तसेच संबंधित अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी सहा महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे विश्वासार्ह अपडेट्स सर्वप्रथम!