नोकरीच्या आमिषाचा पोलिसांचा सापळा; पानटपरीवरील एका फोनने फरार दरोडेखोर जेरबंद!

समृद्धी महामार्गावरील वैजापूर दरोडा प्रकरणातील आणखी 4 आरोपी अटकेत; एकूण 11 जण पोलिसांच्या ताब्यात

नोकरीच्या आमिषाचा पोलिसांचा सापळा; पानटपरीवरील एका फोनने फरार दरोडेखोर जेरबंद!
नोकरीच्या आमिषाचा पोलिसांचा सापळा; पानटपरीवरील एका फोनने फरार दरोडेखोर जेरबंद!
नोकरीच्या आमिषाचा पोलिसांचा सापळा; पानटपरीवरील एका फोनने फरार दरोडेखोर जेरबंद!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ६ :- पोलिसांपासून लपून सातत्याने ठिकाणे बदलणाऱ्या फरार आरोपीला पकडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी आखलेल्या अनोख्या सापळ्याला यश आले आहे. रस्त्याचे काम करणारे ठेकेदार असल्याचे भासवत पोलिसांनी एका पानटपरीवरून वाहनचालकाची नोकरी असल्याचा निरोप दिला आणि चांगल्या पगाराच्या आमिषाने फरार आरोपी स्वतःहून पोलिसांच्या सापळ्यात आला. पानटपरी चालकाने केलेला एक फोन या कारवाईतील निर्णायक दुवा ठरला.

समृद्धी महामार्गावरील वैजापूर दरोडा प्रकरणात आणखी चार फरार आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 11 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी समृद्धी महामार्गावरील एक्झिट क्रमांक 18, हडसपिंपळगावजवळ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे वाहनचालकाला अडवून लुटल्याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 559/2026, कलम 310(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांची स्वतंत्र पथके तपास करीत होती. यापूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, उर्वरित फरार आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होते.

पोलिसांचे वेशांतर; पानटपरीवर रचला सापळा

तपासादरम्यान फरार आरोपी ओमकार रामचंद्र फसले (वय 22, रा. म्हाळस जवळा, जि. बीड) हा गावातच लपून बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. तो वाहनचालक म्हणून काम करीत असल्याची माहितीही पोलिसांना होती.

थेट गावात जाऊन त्याचा शोध घेतल्यास आरोपीला पोलिसांची चाहूल लागू शकते, हे लक्षात घेऊन पोलिसांनी वेगळी योजना आखली. पथकाने वेशांतर करून आपण रस्त्याचे काम करणारे ठेकेदार असल्याचे भासवले.

म्हाळस जवळा गावातील एका पानटपरीवर थांबून सोलापूर-धुळे मार्गावर बीडजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असून, मुरूम वाहतुकीसाठी टिपर चालकाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. चांगला पगार देण्यात येईल, असेही पानटपरी चालकाला सांगण्यात आले.

यावेळी पानटपरी चालकाने गावातील ओमकार फसले हा वाहन चालविण्याचे काम करीत असल्याची माहिती दिली. ओमकारचा मोबाईल बंद असल्याने पानटपरी चालकाने त्याच्यासोबत असलेल्या मित्राशी संपर्क साधला. चांगल्या पगाराची टिपर चालकाची नोकरी असल्याची माहिती मित्रामार्फत ओमकारपर्यंत पोहोचली.

नोकरीच्या संधीला होकार देत ओमकारने तात्काळ पानटपरीवर येण्याचे मान्य केले. सायंकाळच्या सुमारास तो तेथे पोहोचला. ठेकेदाराच्या वेशातील पोलिसांशी नोकरीबाबत चर्चा करताना त्याने स्वतःची ओळख सांगितली आणि ओळखपत्रही दाखविले. ओळख निश्चित होताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

कायगाव टोका येथे दोघांना पकडले

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे दुसरे पथक उर्वरित फरार आरोपींच्या मागावर होते. दोन आरोपी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गाने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कायगाव टोका परिसरात सापळा रचला.

या कारवाईत भिमराव उर्फ शहादेव भगवान तांदळे (वय 26, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) आणि सुनील गणपत चव्हाण (वय 22, रा. दामुनाईक तांडा, ता. गेवराई, जि. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तिसगाव परिसरातून चौथा आरोपी ताब्यात

तपासात सुनील कल्याण शेंडगे (वय 26, रा. धाकलगाव, ता. अंबड, जि. जालना, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) याने गुन्ह्यासाठी स्वतःचे वाहन टोळीला दिल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

तो मुख्य आरोपी परशुराम गायकवाडच्या टोळीचा सक्रिय साथीदार असल्याचेही तपासात समोर आले आहे. यापूर्वी वाळूज परिसरात गुटखा जप्तीच्या कारवाईदरम्यान एफडीएच्या पथकाच्या दिशेने वाहन घालण्याचा प्रयत्न करून गुटख्याचा टेम्पो पळविल्याप्रकरणीही तो पोलिसांच्या शोधात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तो गेल्या तीन महिन्यांपासून शहर पोलिसांना गुंगारा देत असल्याचे सांगण्यात आले. तो तिसगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

11 आरोपी जेरबंद

या गुन्ह्यात यापूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली होती. आता नव्याने चार आरोपी अटकेत आल्याने वैजापूर दरोडा प्रकरणातील एकूण 11 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

आरोपींच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांनी दिल्ली, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील विविध भागांत तपास पथके पाठवली होती. तांत्रिक विश्लेषणासोबतच प्रत्यक्ष क्षेत्रातील माहिती, गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि आरोपींच्या परिचितांकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून तपास करण्यात आला.

या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील दरोडा प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने केली.