पावसाच्या दडीने पिके करपली; आमदार अब्दुल सत्तारांची बांधावर जाऊन पाहणी! सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; तातडीने पंचनाम्याचे आदेश

पावसाच्या दडीने पिके करपली; आमदार अब्दुल सत्तारांची बांधावर जाऊन पाहणी! सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; तातडीने पंचनाम्याचे आदेश
पावसाच्या दडीने पिके करपली; आमदार अब्दुल सत्तारांची बांधावर जाऊन पाहणी! सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; तातडीने पंचनाम्याचे आदेश

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड( प्रतिनिधी) दि ४ :- सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी विविध गावांच्या शिवारात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासकीय मदतीसाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

आमदार सत्तार यांनी डोंगरगाव, पालोद, शिवना, डीग्रस, पानवडोद, धोत्रा, अजिंठा, अनाड तसेच सोयगाव, फर्दापूर, फर्दापूर तांडा, धनवट आणि जंगला तांडा आदी गावांच्या शिवारात भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

पावसाअभावी मका, कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, टोमॅटो आणि मिरचीसह विविध खरीप पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पिके संकटात सापडली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या व्यथा आमदार सत्तार यांच्यासमोर मांडल्या.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, “शेतकऱ्यांनी हताश होऊ नये आणि धीर धरावा. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल.”

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाहीही त्यांनी दिली.

“शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच आपली जबाबदारी आहे,” असेही आमदार सत्तार यांनी यावेळी सांगितले.

या पाहणी दौऱ्यात तहसीलदार सागर वाघमारे, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार (सोयगाव), शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, सय्यद नासेर हुसेन, राजूबाबा काळे, पंचायत समिती सदस्य शेख सलीम, मुरलीधर काळे, नानासाहेब रहाटे, गणेश पाटील, प्रवीण मिरकर, सोयगाव नगरपालिकेतील शिवसेना गटनेता अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, राजू दुतोंडे, पालोदचे सरपंच नासेर पठाण, विनोद काटकर, पानवडोदचे सरपंच गजानन पन्हाळे, प्रमोद दौड, राजुमिया देशमुख, सय्यद कैसर, जीवनसिंग जाधव, इस्माईल कुरेशी, श्यामराव होळकर, सरपंच नाना दांडगे तसेच कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र लांडगे, जोगेंद्र आहेरराव, मंडळ कृषी अधिकारी गणेश इंगळे, सहाय्यक कृषी अधिकारी मीनाक्षी ढाकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.