प्रलंबित अर्थसहाय्यासाठी आमदार अब्दुल सत्तारांचा पाठपुरावा; केंद्राकडून निधी मिळताच लाभार्थ्यांना रक्कम
सिल्लोड–सोयगावसह जिल्हा व राज्यातील लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याची मागणी
महाराष्ट्र वाणी
मुंबई / सिल्लोड दि १३ :- मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अर्थसहाय्य योजनांसाठी अर्ज केलेल्या सिल्लोड–सोयगाव मतदारसंघासह जिल्हा व राज्यातील अनेक पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. या लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य मिळावे, यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
या संदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी १२ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन मुस्ताक अंतुले यांची भेट घेतली. प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी केंद्र सरकारकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नसल्याने अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती चेअरमन मुस्ताक अंतुले यांनी दिली. केंद्राकडून निधी प्राप्त होताच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अर्थसहाय्याची रक्कम तातडीने वितरित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावर मंत्री रिजिजू यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
आवश्यकता भासल्यास केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची लवकरच प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रश्नावर पुढील पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शेख वसीम तसेच फेरोज लाला तांबोळी उपस्थित होते.