'बालविवाहाला नाही, व्यसनाला बाय-बाय' : छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २२ :- जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'बालविवाह निर्मूलन व नशामुक्त अभियान' अंतर्गत बुधवारी भव्य प्रभात फेरी व जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून बालविवाह प्रतिबंध, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या अभियानाचा कालावधी १३ जुलै ते ३१ जुलै २०२६ असा असून, उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पी. एम. मिन्नू यांनी सुदृढ समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने निर्व्यसनी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. तसेच, व्यसनमुक्ती आणि बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती वर्षभर सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मरकर यांनी प्रात्यक्षिकांद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम स्पष्ट केले, तर महिला व बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी बालकांवरील अन्यायाविरोधात पुढे येत चाइल्ड हेल्पलाइनची मदत घेण्याचे आवाहन केले.
यावेळी शारदा मंदिर प्रशाला, इंदिराबाई पाठक महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह व व्यसनमुक्तीवर आधारित प्रभावी पथनाट्ये सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच श्री सरस्वती भुवन प्रशाला, श्री सरस्वती भुवन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आ. कृ. वाघमारे विद्यालय आणि शिशुविहारच्या विद्यार्थ्यांनीही अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात आलेले हे अभियान बालविवाहमुक्त आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.