वनहक्कासाठी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा; प्रलंबित दावे तातडीने मंजूर करण्याची मागणी

वनहक्कासाठी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा; प्रलंबित दावे तातडीने मंजूर करण्याची मागणी
वनहक्कासाठी आंदोलनाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा; प्रलंबित दावे तातडीने मंजूर करण्याची मागणी

महाराष्ट्र वाणी

चंद्रपूर दि ५ :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वनहक्क दावे मंजूर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शांततामय साखळी आंदोलनाला शिवसेना चंद्रपूर तालुका तसेच शिवसेना भारतीय कामगार संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून वनजमिनीवर शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी व वनहक्क धारकांचे दावे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

वनहक्क कायद्यानुसार पात्र असलेल्या सर्व दाव्यांची निष्पक्ष व पारदर्शक फेरतपासणी करून तातडीने वनहक्क पट्टे मंजूर करावेत, तसेच नामंजूर दाव्यांची योग्य तपासणी करून पात्र शेतकरी व वनहक्क धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी केली.

ग्रामसभा, वनहक्क समित्या आणि प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची तपासणी करून प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करावा. तसेच आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली.

“शेतकरी व वनहक्क धारकांना न्याय मिळणे हा त्यांच्या हक्काचा प्रश्न आहे. त्यांच्या शांततामय आंदोलनाला शिवसेनेचा ठाम पाठिंबा आहे. प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही करावी; अन्यथा न्याय्य हक्कांसाठी शिवसेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल,” असा इशारा संतोष पारखी यांनी दिला.