दहीहंडी उत्सवासाठी संभाजीनगरात वाहतूक बदल; शनिवारी ४ ते १० वाजेपर्यंत प्रमुख मार्ग बंद

क्रांतीचौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी.व्ही. सेंटरसह अनेक भागांत वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

दहीहंडी उत्सवासाठी संभाजीनगरात वाहतूक बदल; शनिवारी ४ ते १० वाजेपर्यंत प्रमुख मार्ग बंद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- शहरात ५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत काही प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलीस आयुक्तालयाने जारी केली आहे.

क्रांतीचौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, अविष्कार चौक, बजरंग चौक, टी.व्ही. सेंटर चौक, गजानन महाराज मंदिर चौक तसेच शहरातील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि विविध गोविंदा पथके सहभागी होणार असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीचे नियमन करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.

हे प्रमुख मार्ग राहणार बंद

क्रांतीचौक ते सिल्लेखाना चौक

गुलमंडी परिसरातील पैठणगेट, औरंगाबाद बुक डेपो, बाराभाई ताजिया चौक, सिटीचौक व औरंगपुरा पोलीस चौकीकडून येणारे मार्ग

कॅनॉट प्लेस परिसरातील एचडीएफसी बँक एटीएम चौक, बॉम्बे स्टेशनरी, फोर्ड शो-रूम परिसर व सिडको कार्यालयाकडील मार्ग

चिश्तिया चौक ते हिंदुराष्ट्र चौक परिसर

टी.व्ही. सेंटर चौक परिसरातील साक्षी मंगल कार्यालय, हडको कॉर्नर, जिजाऊ चौक आणि आयपी मेसकडून येणारे मार्ग

गजानन महाराज मंदिर चौकाकडे येणारे पटीयाला बँक, जवाहरनगर पोलीस स्टेशन, त्रिमूर्ती चौक आणि सेव्हनहिल उड्डाणपुलाकडील मार्ग

वाहनचालकांसाठी पोलिसांनी विविध पर्यायी मार्गांची व्यवस्था केली असून, संबंधितांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, परिस्थितीनुसार बंदोबस्तावरील अधिकारी आवश्यकतेनुसार वाहतूक वळवू शकतात किंवा मार्गात बदल करू शकतात.

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच अन्य फौजदारी कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दहीहंडी उत्सवासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी वाहतूक बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.