हेल्मेट नाही! अवघ्या काही तासांत ४,७४६ दुचाकीस्वारांवर कारवाई४७ लाखांचा दंड आकारला; ३८ लाखांची वसुली, शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची विशेष मोहीम

हेल्मेट नाही! अवघ्या काही तासांत ४,७४६ दुचाकीस्वारांवर कारवाई४७ लाखांचा दंड आकारला; ३८ लाखांची वसुली, शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची विशेष मोहीम
हेल्मेट नाही! अवघ्या काही तासांत ४,७४६ दुचाकीस्वारांवर कारवाई४७ लाखांचा दंड आकारला; ३८ लाखांची वसुली, शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची विशेष मोहीम

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- शहरातील वाढते रस्ते अपघात आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. ३ सप्टेंबर रोजी शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ४ हजार ७४६ विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हर्सूल टी, मुकुंदवाडी चौक, जालना रोड परिसर, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल, दर्गा चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक, क्रांती चौक, सेशन कोर्ट, महावीर चौक, रेल्वे स्टेशन चौक, कार्तिकी चौक, मिल कॉर्नर, नगरनाका, ए.एस. क्लब चौक, ओअॅसिस चौक आणि कामगार चौकासह विविध ठिकाणी विशेष तपासणी करण्यात आली.

या मोहिमेत ४७ लाख ८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी ३८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईनंतर शहरातील दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही निदर्शनास येत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे या मोहिमेत सहभाग घेतला.

“हेल्मेट हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मौल्यवान जीवाच्या सुरक्षेसाठी आहे,” असे आवाहन वाहतूक विभागाने नागरिकांना केले आहे. येत्या काळात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.