प्लॅस्टिक माफियांवर मनपाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; राजेश्वरी प्लॅस्टिकवर धाड, ३.२५ टन साठा जप्त
६ लाखांहून अधिक किमतीचे प्रतिबंधित प्लॅस्टिक ताब्यात; २५ हजारांचा दंड, १० लाखांपेक्षा अधिक कॅरीबॅग वापरापासून रोखल्या
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ :- शहरातील प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत पानदरीबा परिसरातील राजेश्वरी प्लॅस्टिक या प्रतिष्ठानावर कारवाई करत तब्बल ३२५० किलोपेक्षा अधिक प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. जप्त मालाची अंदाजे किंमत ६ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. संबंधित प्रतिष्ठानाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
तपासणीदरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लॅस्टिक कॅरीबॅगचा साठा आढळून आला. कारवाईत १० लाखांपेक्षा अधिक प्लॅस्टिक कॅरीबॅग ताब्यात घेण्यात आल्या. जप्त केलेल्या प्लॅस्टिकची नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असून, उर्वरित प्रतिबंधित प्लॅस्टिक नियमानुसार पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक पंडित दाभाडे, नागरिक मित्र पथकाचे देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, संतोष बनकर, ज्ञानेश्वर पाटील, किशन निकम, जयेश मगरे तसेच स्वच्छता जवान दीपक पडुळ, सुभाष दाभाडे, बाबू जाधव आणि किशोर मगरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
३७ टनांहून अधिक प्लॅस्टिक जप्त
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात सुरू असलेल्या विविध कारवायांमध्ये आतापर्यंत ३७ टनांपेक्षा अधिक प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या प्लॅस्टिकची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लॅस्टिकची साठवणूक, विक्री, वितरण अथवा वापर करणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.
“दंडासोबत गुन्हाही दाखल करणार”
आयुक्त अमोल येडगे यांनी प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधातील कारवाईबाबत स्पष्ट भूमिका मांडली. शहराला प्रतिबंधित प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेची मोहीम सुरू असून, यापुढे प्लॅस्टिकचा साठा किंवा विक्री आढळल्यास केवळ दंड न करता नियमानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाईही केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
नागरिकांना पर्यावरणपूरक पिशव्या वापरण्याचे आवाहन
महापौर समीर राजूरकर यांनी नागरिकांना प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले. दैनंदिन खरेदीसाठी कापडी, कागदी किंवा अन्य पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करावा. नागरिकांच्या सहभागातूनच शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.