पाणीटंचाईवर अंबादास दानवेंचा एल्गार,पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल : प्रशासनाला थेट इशार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महानगरपालिका प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेत शहरातील पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी दानवे यांनी प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा पाढा वाचला. “1 जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 133 दिवस झाले असून शहराला किमान 44 वेळा पाणी मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 15 ते 16 वेळाच पाणीपुरवठा झाला. प्रशासन तीन दिवसाआड पाणी येते म्हणत असेल, तर नागरिकांना 15-16 दिवसांनी पाणी का मिळत आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
शहराला दररोज सुमारे 243 एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात फक्त 151 एमएलडी पाणी उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले. “दोन दिवसांत 300 एमएलडी पाणी शहरात येत असेल, तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मग नागरिकांना 7 ते 8 दिवसांनीच पाणी का मिळते?” असा सवालही त्यांनी केला.
गुलमंडी, शहागंज आणि सातारा परिसरातील नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे सांगताना दानवे म्हणाले की, अनेक भागांत 15 ते 16 दिवसांनी पाणी मिळत आहे, तर काही ठिकाणी रात्री 2 वाजता पाणी सोडले जात आहे. सातारा परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्या भागासाठी टाक्यांद्वारे स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अधिकच गंभीर बनली असल्याची टीका दानवे यांनी केली. “शिवसेनेचा महापौर असताना शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. मात्र आता अनेक भागांत 8 ते 12 दिवसांनी पाणी मिळत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
“पुढील 21 ते 22 दिवस अत्यंत कठीण आहेत. नागरिकांना जास्त पाण्याची गरज असताना प्रशासनाने डोळ्यात तेल घालून वितरण व्यवस्थेवर लक्ष ठेवले पाहिजे. अन्यथा ‘लबाडांनो पाणी द्या’सारखे तीव्र आंदोलन पुन्हा उभारावे लागेल,” असा इशारा देत नागरिकांच्या पाणीप्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा अंबादास दानवे यांनी प्रशासनाला दिला.
यावेळी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, प्रमोद ठेंगडे, गोपाल कुलकर्णी, गणेश लोखंडे, राशीद मामू, सचिन खैरे, हनुमान शिंदे, सावित्रीबाई वाणी, राहुल कुमार सोनवणे, रामेश्वर कोरडे, नारायण आघाव, आशा दातार, सुकन्या भोसले, सुनिता सोनवणे आणि छाया देवराज यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
👉 “पाण्यासाठी त्रस्त नागरिकांच्या आवाजाला आता आंदोलनाची धार मिळणार का?”