"कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवू नका, थेट भेटा!" – CEO मिनू पी. एम.; कास्ट्राईब संघटनेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय

"कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवू नका, थेट भेटा!" – CEO मिनू पी. एम.; कास्ट्राईब संघटनेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय
"कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवू नका, थेट भेटा!" – CEO मिनू पी. एम.; कास्ट्राईब संघटनेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २३ :- जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती मिनू पी. एम. यांनी कर्मचाऱ्यांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याचे आवाहन केले. "प्रश्न सोडवण्यासाठी पुढील औपचारिक बैठकीची वाट पाहू नका. अडचणी असल्यास संबंधित खातेप्रमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मला थेट भेटा," असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

१६ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात झालेल्या या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, चंद्रहार ढोकणे यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

बैठकीत सरळ सेवा भरतीतील मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे, रोस्टर अद्ययावत करणे, प्रलंबित पदोन्नती व अनुकंपा भरती, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, आंतरजिल्हा बदलीनंतर आगाऊ वेतनवाढ, वर्ग-४ कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी, तसेच सिंचन विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या विकल्प प्रक्रियेसह विविध महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

प्रशासनाने सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला कास्ट्राईब संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष सुमित भुईगळ यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सुमित भुईगळ यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेतल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले.