✈️ विमानतळ परिसरात लेझर-बीम लाईट्सवर बंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २ :- छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात विमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लेझर लाईट्स आणि बीम लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ (१) व (३) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विमानतळाच्या आसपास असलेल्या फार्म हाऊस, मंगल कार्यालये तसेच विवाह सोहळे आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये ४ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लेझर व बीम लाईट्सचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
लेझर किंवा बीम लाईट्समुळे विमानाच्या वैमानिकाच्या दृष्टीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, विशेषतः विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग करताना वैमानिकाचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे विमान दुर्घटनेचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालये, विवाह व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजक तसेच संबंधित मालकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच अन्य लागू कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र राहतील, असा स्पष्ट इशाराही पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.