शेतकऱ्यांचा वेश, दाट ऊसात सापळा! उजनी जलाशयाच्या काठावरून दोन सराईत आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद
समृद्धी महामार्गावरील लुटमारीतील फरार आरोपींचा तीन दिवस पाठलाग; एकूण ७ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगाव एक्झिट क्रमांक १८ जवळ वाहन अडवून चालकास मारहाण करत लुटमार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन सराईत आरोपींना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी थेट शेतकऱ्यांचा वेश धारण करून उजनी जलाशयालगतच्या दाट ऊसशेतीत सापळा रचला. या कारवाईनंतर सदर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक मागील तीन दिवसांपासून फरार आरोपींच्या मागावर होते.
फरार आरोपी सतत ठिकाण बदलत होते
उमेश लक्ष्मण गायकवाड आणि ज्ञानेश्वर शहादेव जाधव हे दोघे सोलापूर जिल्ह्यातील परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. दोघेही विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले सराईत आरोपी असल्याने पोलिसांची चाहूल लागताच ते वारंवार ठिकाण बदलत होते. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
तपासादरम्यान आरोपी टेंभुर्णी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली. इंदापूरजवळील टोलनाक्यावर दोघे युनिकॉर्न मोटारसायकलवरून जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी महामार्गाच्या विरुद्ध दिशेने मोटारसायकल वळवून पलायन केले.
उजनीच्या काठावर दाट ऊसशेतीत थरारक शोधमोहीम
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी उजनी धरणाच्या जलाशयाच्या दिशेने जाणाऱ्या ऊस आणि द्राक्षबागांमधील पांदण रस्त्यांचा आधार घेतला. हिजगुडे वस्ती, शहागाव परिसरातील विस्तीर्ण उजनी जलाशयालगतच्या दाट ऊसशेतीत ते लपून बसल्याची माहिती मिळाली.
पावसाची परिस्थिती, जलाशयाचा विस्तीर्ण काठ आणि वन्यप्राण्यांचा संभाव्य धोका अशा प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आरोपींचे फोटो दाखविण्यात आले.
यानंतर पोलिसांनी अत्यंत वेगळी रणनीती आखली. पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे वेशांतर केले. खांद्यावर शेतीची अवजारे घेऊन ते नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. त्यामुळे आरोपींना परिसरात पोलीस असल्याचा संशय आला नाही.
युनिकॉर्न मोटारसायकलने दिला महत्त्वाचा धागा
शोधमोहीम सुरू असताना उजनी जलाशयाच्या काठावर आरोपींची युनिकॉर्न मोटारसायकल आढळून आली. त्यामुळे आरोपी अद्याप परिसरातच लपल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसराला वेढा घालण्यात आला.
सर्वत्र शेतकरीच असल्याचा समज झाल्याने आरोपी लपण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. याच क्षणी दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. आरोपींनी झटापट करून पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी शर्थीने त्यांना जेरबंद केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ज्ञानेश्वर शहादेव जाधव (वय ३४, रा. मालेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) आणि उमेश लक्ष्मण गायकवाड (वय २७, रा. पिठी नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) अशी आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आतापर्यंत ७ आरोपी जेरबंद
समृद्धी महामार्गावरील या लुटमारीच्या गुन्ह्यात आतापर्यंत परशुराम मोहन गायकवाड, करण भरत जाधव, किरण अजिनाथ गायकवाड, अनिल जयराम जाधव, पंडीत उर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे, उमेश लक्ष्मण गायकवाड आणि ज्ञानेश्वर शहादेव जाधव अशा एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील इतर आरोपी, वापरण्यात आलेली साधनसामग्री आणि अधिक माहितीच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्यासह वैभव रणखांब, लहु घोडे, महेश घुगे, भारत निकाळजे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांच्या पथकाने केली.