‘बॉटॅनिकल ब्लिट्झ’मध्ये सायमा पीरजादे प्रथम; ३१ विद्यार्थ्यांनी दाखविले वनस्पती ओळख कौशल्य

‘बॉटॅनिकल ब्लिट्झ’मध्ये सायमा पीरजादे प्रथम; ३१ विद्यार्थ्यांनी दाखविले वनस्पती ओळख कौशल्य
‘बॉटॅनिकल ब्लिट्झ’मध्ये सायमा पीरजादे प्रथम; ३१ विद्यार्थ्यांनी दाखविले वनस्पती ओळख कौशल्य

महाराष्ट्र वाणी 

जळगाव दि १ :- इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थिम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘बॉटॅनिकल ब्लिट्झ – झटपट वनस्पती ओळख स्पर्धा २०२६-२७’चे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (१ सप्टेंबर) सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयातील आय.सी.टी. हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांसमोर विविध वनस्पती सादर करण्यात आल्या. निर्धारित वेळेत संबंधित वनस्पतीचे सामान्य नाव, शास्त्रीय नाव तसेच तिचे कुल (Family) ओळखण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. इब्राहिम पिंजारी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. युसूफ पटेल यांनी केले.

स्पर्धेच्या निकालात पीरजादे सायमा इस्माईल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जवेरिया शेख खलील यांनी द्वितीय, तर सिक्कलगर तहेलीम फातिमा शेख हमीद यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

विद्यार्थ्यांना वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने ओळख करून देण्यासोबतच वनस्पती वर्गीकरणशास्त्राबाबत (Plant Taxonomy) रुची निर्माण करणे, निरीक्षण व ओळख कौशल्य विकसित करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. प्रत्यक्ष वनस्पतींच्या आधारे घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील व्यावहारिक ज्ञान मिळण्यासही मदत झाली.

स्पर्धेच्या आयोजनासाठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. तन्वीर खान, डॉ. फिरदोस शेख, प्रा. उमर पठाण आणि प्रा. प्रवीण घाडगे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.