संभाजीनगर 'चक्काजाम', गुन्हेगारी बेलगाम; हेल्मेट कारवाईत पोलीस मग्न — नझीमोद्दीन काजी यांचा आरोप
वाहतूक कोंडी आणि वाढत्या गुन्हेगारीने जनता त्रस्त; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षांचा सवाल
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- शहरातील ढासळलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांना दररोज तासन्तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, वाढत्या गुन्हेगारीमुळेही नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे हेल्मेट सक्ती आणि ई-चालान कारवाईवर पोलीस प्रशासनाचा मोठा भर दिसत असताना, शहरातील वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लोकशाही पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नझीमोद्दीन काझी यांनी केला आहे.
रांगणाऱ्या वाहनांच्या रांगा, तासन्तास कोंडलेली वाहतूक, वन-वे व नो-एंट्रीच्या नियमांचे उल्लंघन आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास त्रासदायक बनला आहे. अनेक प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी दिसत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस विभागात एक पोलीस उपायुक्त, एक सहाय्यक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक आणि मोठ्या संख्येने वाहतूक कर्मचारी कार्यरत असतानाही शहरातील परिस्थिती सुधारत नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पादचाऱ्यांसाठीचे फूटपाथ अतिक्रमणामुळे बाधित झाले असून, नो-एंट्रीमध्ये अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था विस्कळीत असताना दौलताबाद टी-पॉईंट, हरसूल टी-पॉईंट, केंब्रिज हायस्कूल परिसर, पैठण रोड आणि झालटा फाटा आदी शहर प्रवेश मार्गांवर पोलीस कारवाई अधिक सक्रिय असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या ठिकाणी कारवाईच्या नावाखाली वसुली होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.
दरम्यान, शहरात वाहनचोरी, साखळी चोरी, घरफोडी आणि वाटमारीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडल्याचा दावा करण्यात आला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहरातील कथित अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या सर्व परिस्थितीत शहरातील लोकप्रतिनिधींनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेऊन प्रशासनाला जाब विचारावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
“हेल्मेट कारवाई आवश्यक आहे; मात्र शहरातील वाहतूक व्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि वाढती गुन्हेगारी याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशासनाने सर्वच प्रश्नांवर संतुलित आणि प्रभावी कारवाई करावी,” अशी मागणी लोकशाही पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नझीमोद्दीन काझी यांनी केली आहे.
शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा एखाद्या गंभीर दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.