सरपंच पंकज जैस्वाल यांच्या प्रयत्नांना यश; रेलगावच्या महादेव मंदिर परिसरात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड (रेलगाव) दि ९ :- गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून रेलगाव येथील श्री महादेव मंदिर परिसरात नव्याने सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या विकासकामामुळे मंदिर परिसरातील नागरिकांसह भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महादेव मंदिरासमोरील परिसरात यापूर्वी सिमेंटचा रस्ता असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत होते. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच परिसरातील नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे आणि वाहतुकीची गैरसोय यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत होती.
ही समस्या लक्षात घेऊन सरपंच पंकज जैस्वाल यांनी परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नांमुळे महादेव मंदिर परिसरातील नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
नवीन रस्त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होणार असून, परिसरात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच भाविक आणि नागरिकांची सुरक्षित व सुलभ वाहतूक होण्यास मदत होणार आहे.
या विकासकामामुळे श्री महादेव मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुस्थितीत आणि सुविधायुक्त झाला असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. गावातील मूलभूत सुविधा सुधारण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येणारी अशी लोकहिताची कामे रेलगावच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरत आहेत.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने लोकहिताची कामे केली जात राहिल्यास रेलगाव अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुविधायुक्त होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.