शहरात येण्यापूर्वीच प्रतिबंधित प्लास्टिकला मनपाचा दणका! सार्को ट्रान्सपोर्टमधून १,०८० किलो कॅरीबॅग जप्त; संबंधितांकडून २५ हजारांचा दंड वसूल

शहरात येण्यापूर्वीच प्रतिबंधित प्लास्टिकला मनपाचा दणका! सार्को ट्रान्सपोर्टमधून १,०८० किलो कॅरीबॅग जप्त; संबंधितांकडून २५ हजारांचा दंड वसूल
शहरात येण्यापूर्वीच प्रतिबंधित प्लास्टिकला मनपाचा दणका! सार्को ट्रान्सपोर्टमधून १,०८० किलो कॅरीबॅग जप्त; संबंधितांकडून २५ हजारांचा दंड वसूल

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- शहरातील प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहराबाहेरून येणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या पुरवठ्यावर थेट लक्ष केंद्रित केले आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या विविध मार्गांवर तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिकची वाहतूक रोखण्याची मोहीम मनपाने तीव्र केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सार्को ट्रान्सपोर्ट येथे धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅगचा साठा जप्त केला. शालिमार प्लास्टिकचे मालक नाजीम शेख यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या या मालामध्ये तब्बल १,०८० किलो प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्या. याप्रकरणी संबंधितांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महानगरपालिकेने यापूर्वी शहरातील प्लास्टिक विक्रेते, घाऊक व्यापारी तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मात्र, शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा पुरवठा बाहेरून होत असल्याचे लक्षात आल्याने आता शहरात प्रवेश करण्यापूर्वीच प्लास्टिकचा पुरवठा रोखण्याची नवी रणनीती मनपाने अवलंबली आहे.

प्रतिबंधित प्लास्टिकचा पुरवठा करणाऱ्या स्रोतांवर थेट कारवाई करून शहरातील वापरावर आळा घालण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून, येत्या काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

ही कारवाई महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे यांच्या नियोजनाखाली करण्यात आली. कारवाईत नागरिक मित्र पथकाचे देविदास सुसर, विष्णू काकडे, मच्छिंद्र वाघ, कैलास भोसले, कैलास सोनवणे, बाबुराव सपकाळ तसेच जवान आनंद चावरीया यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिकेने नागरिक, व्यापारी आणि प्लास्टिक विक्रेत्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री आणि साठवणूक टाळण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.