स्वच्छ, सुंदर वेरूळसाठी प्रशासनाचे श्रमदान; तीन तासांत ५० टन कचरा संकलित
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २७ :- श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यटन व धार्मिक महत्त्व असलेल्या वेरूळ येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी श्रमदान करत अवघ्या तीन तासांत वेरूळ परिसराची स्वच्छता केली. या अभियानात तब्बल ५० टन कचरा संकलित करण्यात आला.
वेरूळ नगरपरिषदेने पुढाकार घेत राबविलेल्या या स्वच्छता अभियानात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार प्रशांत बंब, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम., जिल्हा परिषद सदस्य कृणाल दांडगे, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, वेरूळच्या सरपंच कुसुमबाई प्रकाश मिसाळ, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, नगरपालिका प्रशासन अधिकारी सौरभ जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
वेरूळ हे जागतिक पर्यटनस्थळ तसेच महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. श्रावण महिन्यात येथे भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरण मिळावे, यासाठी हे अभियान राबविण्यात आले. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती नियमितपणे राबविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
४०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
स्वच्छता मोहिमेसाठी सुमारे ४० कचरा संकलन वाहने तैनात करण्यात आली होती. त्यापैकी १० मोठी वाहने तसेच १०० कर्मचारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत सुमारे ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
वेरूळ लेणी परिसर, अरिहंत चौक, घृष्णेश्वर मंदिर परिसर, मालोजी राजे भोसले गढी परिसर आणि भोसले चौक या प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
विकासकामांचीही पाहणी
स्वच्छता अभियानानंतर वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली. भक्ती निवास, नवीन दुकाने आणि नवीन मार्गाच्या कामांचा संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांशी चर्चा करून भाविक व पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
आरोग्य विभागाचाही सक्रिय सहभाग
या अभियानात आरोग्य विभागानेही सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान राऊत, डॉ. रंगनाथ तुपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आफताब शेख, डॉ. अविनाश बेरे यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी सहभाग घेतला.
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’चा संदेश
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. निरोगी जीवनासाठी परिसराची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच कचऱ्याचे योग्य विलगीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.