मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातर्फे ‘नमो नेत्र स्वास्थ संजीवनी अभियान’
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२४ :– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात दि.१७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर या कालावधीत ‘नमो नेत्र स्वास्थ संजीवनी अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचे आयोजन मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत भटक्या जमाती वस्ती, दलित वस्ती, जनजाती क्षेत्रे तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये विशेष नेत्र-स्वास्थ्य सेवा पुरविली जाणार आहे. यामध्ये नेत्र तपासणी, औषधोपचार, मोफत शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, अंधकाठी वाटप तसेच नेत्रदानाविषयी जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालये व विविध स्वयंसेवी संस्था, विभाग यांच्या सहकार्याने शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून गरजू नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नेत्रविषयक कंझ्युमेबल्स, इम्प्लांट्स, औषधे किंवा आर्थिक स्वरूपातील मदतीसाठी सेवाभावी संस्था व दाते यांनी पुढे यावे, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त राजेश पावसकर यांनी केले आहे.