“अंभईच्या घशाला कोरडं! केळगाव धरणाचं पाणी पाटाला सोडू नका — जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीची थेट धाव"

“अंभईच्या घशाला कोरडं! केळगाव धरणाचं पाणी पाटाला सोडू नका — जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीची थेट धाव"
“अंभईच्या घशाला कोरडं! केळगाव धरणाचं पाणी पाटाला सोडू नका — जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीची थेट धाव"

✍️ महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड, अंभई (प्रतिनिधी) दि १४ :- मौजे अंभई, ता. सिल्लोड येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, केळगाव धरणातील पाणीसाठा पाटाद्वारे सोडू नये अशी ठाम मागणी ग्रामपंचायत अंभईकडून करण्यात आली आहे. या संदर्भात दि. १४ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

अंभई गावाची संपूर्ण पाणीपुरवठा योजना केळगाव धरणावर अवलंबून आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर पाटाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने, गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

मागील वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पाटाला पाणी सोडल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आणि भर उन्हाळ्यात अंभई गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता.

यंदाही जर पाटाचे पाणी सोडण्यात आले, तर अंभई गावावर पुन्हा पाण्याचे संकट ओढावणार असल्याचा गंभीर इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे केळगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठा हा फक्त अंभई गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवावा, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालया तर्फे हे निवेदन ग्रामपंचायत सदस्य समाधान भुईगळ, जगन्नाथ जाधव, राजेंद्र सोनवणे व ग्रामस्थ गंगाधर दांडगे, तुकाराम दांडगे यांनी सादर केले.

या निवेदनाची प्रतिलिपी अधीक्षक अभियंता (पाटबंधारे विभाग), उपविभागीय अभियंता, उपविभागीय अधिकारी (महसूल), गटविकास अधिकारी, तहसीलदार तसेच आमदार अब्दुल सत्तार (सिल्लोड–सोयगाव) यांनाही माहिती व तातडीच्या कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.

ग्रामस्थांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून, वेळीच निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“पाणी नाही तर जीवन नाही — अंभईचा आवाज आता प्रशासनापर्यंत पोहोचणार का?”