मतदारांच्या गृहभेटीतूनच काम करा; राजकीय कार्यालयांतून कामकाज करू नका – जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणात पारदर्शकतेवर भर; नियमभंग करणाऱ्या बीएलओंवर कारवाईचा इशारा

मतदारांच्या गृहभेटीतूनच काम करा; राजकीय कार्यालयांतून कामकाज करू नका – जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १९ :- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी मतदारांच्या गृहभेटीद्वारे कामकाज करावे आणि आवश्यकतेनुसार आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर किंवा शासकीय कार्यालयातूनच कार्य करावे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयातून किंवा इतर ठिकाणांहून कामकाज करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असून या कामासाठी ३,२६४ बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच विविध राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त केले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखणे हा निवडणूक आयोगाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही बीएलओ हे राजकीय पक्षांच्या कार्यालयात, पदाधिकाऱ्यांकडे किंवा नगरसेवकांच्या कार्यालयातून कामकाज करत असल्याच्या तक्रारी आणि वृत्ते समोर आल्याची दखल प्रशासनाने घेतली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, बीएलओंनी मतदारांच्या गृहभेटी घेऊन माहिती संकलित करावी आणि त्यानंतर आवश्यक कामकाज केवळ नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर किंवा शासकीय कार्यालयातूनच करावे. याशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी कामकाज करताना आढळल्यास संबंधित बीएलओंविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल