बेकायदा पाणी उपशामुळे केळगाव तलाव कोरडा; अंभईसह चार गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड(अंभई) दि ७ :- तालुक्यातील केळगाव तलावातील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने अंभई, जांभई, रेलगाव शेखपूर आणि पिंपळगाव परिसरातील नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. अंभई गावात गेल्या पंधरा दिवसांपासून नळांना पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना खासगी स्रोतांकडून पाणी विकत घ्यावे लागत असून, एका टँकरसाठी १२०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. खासगी पाण्याच्या पंपांवर तासन्तास रांगा लागत आहेत. अनेक महिला आणि लहान मुलेही मैलोनमैल अंतरावरील विहिरींवरून पाणी आणण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
स्थानिकांच्या मते, तलावातून मोठ्या प्रमाणात यंत्रांच्या सहाय्याने बेकायदा पाणी उपसा करण्यात आल्याने पाण्याची पातळी वेगाने कमी झाली आहे. याशिवाय तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे उपलब्ध पाण्याचे अचूक मोजमाप करणेही कठीण झाले आहे.
दरम्यान, या परिस्थितीचा फटका मत्स्यव्यवसायालाही बसला आहे. केळगाव तलावावर अवलंबून असलेल्या सुमारे २० ते २५ मच्छीमार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
मच्छीमार मंगल चुन्नीलाल परदेशी यांनी सांगितले की, यंदा सुमारे चार लाख रुपयांचे मत्स्यबीज तलावात सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याची पातळी घटल्याने मोठ्या प्रमाणात मासे दगावले. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दरवर्षी २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या हक्काच्या बातम्यांसाठी!